जगातील टॉप १० शाळांमध्ये पुण्यातील जिल्हा परिषद शाळेचा समावेश | Top Indian School Global Ranking 2025

Top Indian School Global Ranking 2025 : जागतिक स्तरावर भारतीय शाळांची यशस्वी घौडदौड ब्रिटनमधील शैक्षणिक संस्था T4 Education ने आयोजित केलेल्या “World’s Best School Prizes 2025” या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातील चार शाळांनी आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेत जगभरातील हजारो शाळांनी सहभाग घेतला होता, परंतु फक्त १० सर्वोत्तम शाळांची अंतिम निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या यादीमध्ये पुण्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश झाला आहे.

झेडपी शाळा, जालिंदरनगर – मराठी माध्यमातून आंतरराष्ट्रीय यश

ही शाळा २०२१ मध्ये बंद होण्याच्या उंबरठ्यावर होती. केवळ ३-४ विद्यार्थी शिल्लक होते, पण मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या प्रयत्नांमुळे शाळेचे संपूर्ण रूप पालटले. त्यांनी “Subject Friend” नावाचा अनोखा तंत्र वापरला – ज्यात मोठे विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना शिकवतात. या सहशिक्षण तंत्रामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या आता १२० वर पोहोचली आहे.

शाळेचे यश केवळ शैक्षणिकच नव्हे, तर समुदायाच्या सहभागाने आणि शिक्षकांच्या समर्पणामुळे घडलेले परिवर्तन हे जागतिक व्यासपीठावर आदर्श ठरले आहे. यामुळेच या शाळेला Community Collaboration या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

इतर भारतीय शाळाही यादीत

या यादीमध्ये भारतातील अजून तीन शाळांचा समावेश झाला आहे:

  • Government Girls Senior Secondary School, फरीदाबाद (हरियाणा) – “Supporting Healthy Lives” श्रेणीमध्ये
  • Ekya School, बेंगळुरू (कर्नाटक) – “Innovation” श्रेणीत
  • Delhi Public School, वाराणसी (उत्तर प्रदेश) – “Environmental Action” श्रेणीत

या शाळांनी त्यांच्या कार्यपद्धतीतून सामाजिक, पर्यावरणीय, आणि आरोग्यविषयक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

विजेते जाहीर होणार ऑक्टोबर २०२५ मध्ये

T4 Education या संस्थेने ५ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये शाळांची निवड केली आहे आणि प्रत्येक विजेते शाळेला ₹१ कोटींचे बक्षीस दिले जाईल. विजेते ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर केले जातील. तसेच या सर्व १० अंतिम शाळांना “World Schools Summit” मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, जो नोव्हेंबर २०२५ मध्ये अबू धाबी येथे होणार आहे.

हे सुद्धा वाचा:- रिचरखा: एका आयटी इंजिनीयर महिलेची कोटींच्या टर्नओव्हरकडे नेलेली यशोगाथा

ग्रामीण भागातील सरकारी शाळेची आंतरराष्ट्रीय झेप

पुण्यातील ही जिल्हा परिषद शाळा ही या यादीतील एकमेव मराठी माध्यमातील सरकारी शाळा आहे. एकेकाळी जी शाळा बंद होणार होती, ती आज जगातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणली जात आहे, हे महाराष्ट्रासाठी, भारतासाठी आणि संपूर्ण ग्रामीण शिक्षणपद्धतीसाठी गौरवाची बाब आहे.

शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, अभ्यासक्रम किंवा सुविधा असणे महत्वाचे असते, परंतु शिक्षकांची समर्पित वृत्ती, विद्यार्थ्यांची जिद्द आणि समुदायाचा पाठिंबा या गोष्टीही शिक्षणात परिवर्तन घडवू शकतात, हे झेडपी शाळा जालिंदरनगरने सिद्ध केले आहे. ही कहाणी केवळ प्रेरणादायी नाही, तर भारतीय ग्रामीण शिक्षणाच्या शक्तीचा जागतिक पुरावा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *