मित्रांनो यूपीएससी (UPSC ) ही देशातील सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा. लाखो तरुणांचं स्वप्न हे अधिकारी बनून देशसेवा करण्याचं असत. कोणाच्या वाट्याला यश येतं, कोणाचं स्वप्न अपयशात विरून जातं. पण जेव्हा कुणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत आणि मोठं यश मिळवतं, तेव्हा ती यशाची कहाणी काही वेगळीच असते आणि हजारो जणांना प्रेरणा देणारी ठरते. अशीच एक असामान्य कथा आहे कोल्हापूरच्या बिरदेव सिद्धापा डोणे यांची.
जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची उंच भरारी, मेंढपाळाच्या मुलाचं IPS होण्याचं स्वप्न | Inspiring UPSC Journey of Birdev Done from Kolhapur
मेंढपाळाच्या घरात जन्मलेला बिरदेव, आपल्या जिद्दीच्या जोरावर UPSCमध्ये 551वा क्रमांक मिळवतो, हेच आपल्याला सांगतं की परिस्थिती कधीही स्वप्नांची मर्यादा ठरवत नाही. हे यश त्याने वयाच्या 27 व्या वर्षी मिळवलं. आणि तेही अशा वेळी, जेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत कर्नाटकमधील अथणी येथे मेंढ्यांमध्ये व्यस्त होता.
शून्यातून शिखराकडे यमगे गावातून देशसेवेपर्यंतचा प्रवास
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातलं यमगे हे त्याचं मूळ गाव. प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतच. दहावीत 96% गुण, आणि मुरगूड केंद्रात अव्वल क्रमांक. बारावीतही 89% गुणांसह पहिला क्रमांक. पुढे पुण्यातील COEP मधून इंजिनिअरिंगचं शिक्षण. शिक्षणात सातत्याने उत्तुंग कामगिरी केल्यानंतरही त्याचं मन अधिक मोठ्या उद्दिष्टांमध्ये गुंतलेलं होतं ते म्हणजे आयपीएस अधिकारी बनण्याचं.
स्वप्न मोठं होतं, पण परिस्थिती बिकट होती
UPSCची तयारी करणं म्हणजे मोठा खर्च. दिल्ली किंवा पुणे येथे राहून कोचिंग घेणं सहज शक्य नव्हतं. वडिलांनी नोकरीचा सल्ला दिला. पण बिरदेवचं स्वप्न मात्र ठाम होतं. अशा वेळी त्याचा भाऊ, जो भारतीय सैन्यात कार्यरत आहे. त्याने बिरदेवच्या शिक्षणाचा संपूर्ण भार उचलला. दोन वर्षं दिल्ली, नंतर पुणे. सातत्यपूर्ण अभ्यास, अपयशानंतरही न खचता प्रयत्न सुरू ठेवले.
हे सुध्दा वाचा:- डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतून मिळवा निवास भत्ता
निकाल जाहीर झाला, पण हिरो गावात नव्हता, तो मेंढ्यांमध्ये होता!
ज्यावेळी देशभरात यूपीएससीचा निकाल गाजत होता, त्याचवेळी बिरदेव आपल्या आई-वडिलांसोबत बेळगावजवळ मेंढ्यांमध्ये होता. निकालाची बातमी कळताच धनगरी पारंपरिक पद्धतीनं त्याचा सत्कार झाला. पाठीवर फेटा, डोक्यावर यशाचा मुकुट! त्या क्षणी फक्त एकाच गोष्टीचा पुरावाच मिळाला. जिथे जिद्द असते, तिथे रस्ताही तयार होतो.
बिरदेव डोणेचं यश फक्त वैयक्तिक विजय नाही. ते प्रत्येक अशा तरुणासाठी प्रेरणास्त्रोत आहे, ज्याच्याकडे स्वप्नं आहेत पण साधनं नाहीत. त्याच्या कथेने हे सिद्ध केलं की संघर्ष कितीही मोठा असला, तरी जर मन मोठं असेल, तर यश नक्कीच गवसतं.
येणाऱ्या पिढीने याच्यातून काय शिकले पाहिजे?
परिस्थिती कधीही अडथळा ठरत नाही
गरिबी, साधी पार्श्वभूमी, सुविधा नसणं हे यश मिळवण्यासाठी अडथळे असले तरी अपयश नाही. आत्मविश्वास आणि चिकाटी असेल तर कोणतीही परिस्थिती जिंकता येते.
स्वप्न मोठं असावं, भलेही परिस्थिती छोटी असो
मेंढपाळाचा मुलगा आयपीएस अधिकारी होतो, हेच सांगतं की स्वप्नांची उंची ही तुमच्या आर्थिक स्थितीवर नाही, तर तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.
अपयश म्हणजे शेवट नव्हे, सुरुवात असते
दोन वेळा अपयश आलं, तरीही खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं. यावरून शिकायला मिळतं की अपयश म्हणजे शिकण्याची संधी आहे, हार मानण्याचं कारण नाही.
कुटुंबाचा पाठिंबा अमूल्य असतो
बिरदेव यांचा भाऊ सैन्यात असून त्याने आर्थिक पाठबळ दिलं. त्यामुळे हे समजतं की कुटुंब एकत्र असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.
जमीन सोडू नका, नम्र राहा
निकाल लागल्यानंतर बिरदेव मेंढ्यांमध्येच होता, आणि त्याच ठिकाणी त्याचा सत्कार झाला. हे दाखवतं की यश आल्यावरही मातीशी नातं तोडू नये.
शिक्षण म्हणजे परिवर्तनाचं साधन आहे
शिक्षणाच्या जोरावरच बिरदेव यांचं आयुष्य बदललं. त्यामुळे प्रत्येक पिढीने हे लक्षात घ्यावं की शिक्षण हे केवळ पदवीसाठी नाही, तर आयुष्य बदलण्यासाठी असतं.